Click here to switch to English version.
होळीचा हा रंगतदार सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण मार्च महिन्यामध्ये येतो. वाळलेली, उन्मळून पडलेली झाडे, जुने तुटलेले लाकडी सामान, काटक्या वगैरेंच्या सहाय्याने होळी उभी करतात. आंब्याची पाने, फुले, हार यांनी ती सजवतात. हळदकुंकू वाहून, नारळ चढवून तिची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व नंतर होळी पेटवतात. होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. होळी बद्दलच्या अनेक कथा-दंतकथांमुळे हा सण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाला आहे.

निरनिराळ्या प्रांतांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. श्रीकृष्णाला मारण्यासाठी स्त्रीरूप घेउन आलेल्या पूतना राक्षसिणीला कृष्णाने याच दिवशी मारले व मग गोकुळातल्या लोकांनी तिचे दहन केले. त्यामुळे उत्तर भारतातील लोक हा श्रीकृष्णाचा उत्सव मानतात. शंकरांना कामप्रवृत करण्यासाठी आलेल्या मदनाला शंकरांनी याच दिवशी जाळून भस्म केले. त्यामुळे दक्षिण भारतातील लोक मदन दहनाचा उत्सव म्हणून होळी साजरी करतात. महाराष्ट्रात होळीला, आपल्या मनातील वाईट विचार, भावना, इतरांबद्दलचा मत्सर, द्वेष नष्ट करून येणाऱ्या नवीन वर्षाला मोकळ्या मनाने सामोरे जाण्याचा दिवस मानतात.
काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी (धुळवडीच्या दिवशी) होळीतील राख, माती अंगाला लावून होळीवरच तापवलेल्या पाण्याने आंघोळ करतात. त्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही, अशी (बरीचशी खरी) समजूत आहे

पुराणातील कृष्णाच्या गोपिकांबरोबर रंग खेळण्याच्या कथांपासून ते आत्ताच्या तरुण पिढीच्या होळीच्या गाण्यांच्या तालावर थिरकण्या पर्यंतचा हा रंगतदार उत्सव प्रेमाचे, सामाजिक दरी/अंतर कमी करण्याचे आणि दृढ असलेले संबंध नव्याने घट्ट करण्याचे प्रतीक आहे
नवीन पिकांचा, आंब्याच्या मोहोराचा आणि फणसाचा सुगंध दरवळायला सुरुवात झालेली असतानाच येतो गुढीपाडवा! हिंदू दिनदर्शिकेचा पहिला दिवस. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात, व आंध्र प्रदेशात हिंदू नववर्षदिन म्हणून साजरा होतो. हूण राजांचा पराभव करून शालिवाहन राजाने प्रजेला जुलमी राजवटीतून सोडवले ते याच दिवशी! म्हणून या दिवसापासून नवीन शालिवाहन शकाचा आरंभ होतो.

याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, असेही मानतात. गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडूलिंबाची पाने गुळाबरोबर खातात. त्यामुळे आरोग्य लाभते. एका बांबूच्या टोकाला जरीचे रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे पालथे घालून कडूलिंबाच्या डहाळा, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून तो ध्वज म्हणजे गुढी दरवाजात उभारतात. दुपारी श्रीखंड, बासुंदीसारख्या मिष्टान्नाचे भोजन करतात. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते.

नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आनंदात साजरा केला की संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे, आनंदाचे जाते.

आम्ही DVMMM मध्ये कडूलिंबाची पाने खाण्याची सक्ती तुमच्यावर नक्कीच करणार नाही. पुरणपोळी, लाडू, श्रीखंड, बासुंदी ही सगळी पक्वान्ने खिलवण्याचे आश्वासनही तुम्हाला देणार नाही. DVMMM च्या इतर सभासदांबरोबर करावयाच्या मौजमजेबाबत कोणतीही तक्रार करण्याची संधी तुम्हाला देणार नाही, हे मात्र आम्ही 'मंडळी' नक्कीच सांगतो.

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे-
कार्यक्रमाचे स्थळ: डेलावेअर हिंदू मंदिर, वेडिंग हॉल. नकाशा पहा.
तारीख व वेळकार्यक्रमाचे स्थळ:: २५ मार्च २०१२, दुपारी १२:००
तपशील:

वेळतपशील
१२:०० ते १:३० भोजन
२:०० ते ३:०० लहान मुलांचे विविध मजेशीर कार्यक्रम
३:३० ते ५:३०
चक्रव्यू - मराठी नाटक (DVMMMची प्रस्तुती)

दर:

RSVP सकट सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे) $१३.०० ($13.00)
RSVP सकट सदस्य-विद्यार्थी दर $१०.०० ($10.00)
RSVP सकट बाल सदस्याचे दर (५ ते ११ वर्ष) $८.०० ($8.00)
RSVP शिवाय सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे) $१७.०० ($17.00)
RSVP सकट गैर-सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे) $१७.०० ($17.00)
RSVP शिवाय गैर-सदस्याचे दर (१२ वर्ष आणि मोठे) $२०.०० ($20.00)
बाल सदस्याचे दर (५ वर्ष पेक्षा लहान) विनामूल्य

तयारीसाठी आपली RSVP १८-मार्च-२०१२ पर्यंत करावी ही नम्र विनंती. .